<
मुंबई (प्रतिनिधी ) : संकल्प संस्था आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई सर्वोदय मंडळ ग्रँटरोड येथे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचा सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला.
४ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत सामाजिक क्षेत्रातील कार्य करीत असलेल्या तसेच समाजकार्याची आवड असणार्या कार्यकर्त्यांचे १५ आठवड्याचे सामाजिक कार्य आणि मानवी हक्क प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये समाज कार्य म्हणजे काय, समाजकार्याचे महत्त्व, नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, गट कार्य, प्रचार प्रसिद्धी माध्यमे, सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका आणि विविध सामाजिक समस्या या विषयांवर तज्ञ व्यक्तीं कडून प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच दोन दिवसीय निवासी शिबिराच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास व स्वपरिचय याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. काही संस्था, संघटना, प्रशासकीय कार्यालय येथे शैक्षणिक भेटींद्वारे त्यांचे कार्य समजावून देण्यात आले.
राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचा सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे टी. आर. के. सोमय्या (अध्यक्ष, मुंबई सर्वोदय मंडळ व ज्येष्ठ गांधीवादी) तसेच हुसेन शेख (विश्वस्त सर्व सेवा संस्था), जयश्री (माई) सावर्डेकर (जेष्ठ समाजसेविका),
कार्यक्रमाचे आयोजक विनोद हिवाळे (अध्यक्ष, संकल्प संस्था) आणि सूरज भोईर (अध्यक्ष, मैत्री संस्था) यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आले. विजय मोरे यांनी एक सुंदर गीत सादर केले. सूरज भोईर यांनी उपस्थित पाहुण्यांचा अल्प परिचय करून दिला. पाहुण्यांचे स्वागत कपिल शिरसागर यांनी केले. इलियास काजी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.
सर्व प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणा दरम्यान आपले अनुभव काय होते, काय शिकायला मिळाले, काही अडचणी असतांना देखील प्रशिक्षण कसे यशस्वी पूर्ण केले, तसेच भविष्यात त्यांची वाटचाल कशी असेल ह्याबद्दल मनोगताच्या माध्यमातून सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन भविष्यासाठी यथोचित मार्गदर्शन केले.
श्री दत्तगुरु महिला मंडळ मानखुर्द यांनी एक समूह गीत सादर केलं. विनोद हिवाळे यांनी भविष्यातले कार्य कसे असेल याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी बेळणेकर तर आभारप्रदर्शन तेजस्विनी डोहाळे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.