<
भडगाव(प्रतिनिधी)- सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय आबासाहेब मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्वर्गीय वत्सलाबाई मधुकर जकातदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. आभासी (ऑनलाईन) पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नाशिक येथील एच.पी.टी. आर्टस् आणि आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रुती अशोक बोरस्ते हिने प्रथम क्रमांक पटकावला.
तिला ५००० रूपये रोख , स्मृतिकरंडक व प्रमाणपत्र देण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगली (भारती विद्यापीठ, पुणे)चा विद्यार्थी शिवम संजय मालकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याला ३०००रूपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा विद्यार्थी जयेश संजय सोनार व बी.के. बिरला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कल्याण येथील विद्यार्थी यश रवींद्र पाटील यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. २०००रूपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ५०० रूपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजी येथील विद्यार्थी अक्षय मारुती शेळके व सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थिनी कु. समीक्षा ज्ञानेश्वर आव्हाळे यांनी प्राप्त केले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय ओंकार वाघ होते. उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश जकातदार (सेवानिवृत्त गणित विभागप्रमुख, सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट, मुंबई) उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.जी. एस. अहिरराव यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले.
पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक व स्पर्धेचे प्रायोजक विनय मधुकर जकातदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ संचालक खलील देशमुख उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनंदा जकातदार (नागपूर), प्रा. डॉ. प्रशांत देशमुख (रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी) व प्रा. डॉ. दीपक मराठे (सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव) यांनी काम पाहिले. यावेळी रेखा जकातदार, उपप्राचार्य प्रा.एस.आर.पाटील यांची उपस्थिती होती. परीक्षकांच्या वतीने सुनंदा जकातदार यांनी स्पर्धेसंबंधीचे आपले मत नोंदवले.
सूत्रसंचालन डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर डॉ. सी. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘कोविड-१९ चा शिक्षणावरील परिणाम’, ‘ऑनलाइन शिक्षणपद्धती शिक्षणव्यवस्थेत बदल घडवू शकते काय ?’, ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि सद्यस्थिती’ आणि ‘नवीन कृषी कायदा आणि आजचा शेतकरी’ हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. बी.एस. भालेराव यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.