<
जळगाव-(प्रतिनिधी) – दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय रोजगार मेळाव्याचा बुधवारी सायंकाळी समारोप झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हयातील औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांनी याठिकाणी सहभागी झाल्या. यावेळी उपस्थित युवकांच्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोंदण्या करुन घेण्यात आल्या तसेच मुलाखतीत पात्र ठरलेल्या साठ युवकांची निवड विविध कंपन्यांमध्ये यावेळी झाली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुप प्रकाश, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनादी बिश्वास, मनुष्यबळ विकास सल्लागार हेमंत भिडे, राज्य व्यवस्थापक किरण पाटील, उद्योजक समाधान पाटील आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थिती बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगारक्षम करून प्रत्येक हाताला काम देणे, शासनाने ध्येय आहे तसेच उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याबरोबरच युवक युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे, ही काळाची गरज असल्याचे डॉ. पंकज आशिया आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक मिनल कुटे यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई यांनी केले. जिल्हा अभियान व्यवस्थापक राहुल इथे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.