<
जळगाव, २६ डिसेंबर
येथील उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका रेवती शेंदुर्णीकर यांची लखनौ येथे नुकत्याच झालेल्या सहकार भारतीच्या तीनदिवसीय अधिवेशनात राष्ट्रीय महिला प्रमुखपदी निवड करण्यात आली.
या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी उपस्थित होते. यावेळी देशभरातील सहकार क्षेत्रातील महिला बचत गट तसेच महिलांसाठी कार्य करणार्या संघटनांना अनेक उच्चपदस्थ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यात सर्वश्री भैय्याजी जोशी, सतीश मराठे आदींसह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका रेवती शेंदुर्णीकर यांची राष्ट्रीय महिला प्रमुखपदी निवड करण्यात आली.
सतत कार्यरत
यासंदर्भात ’तरुण भारत’ शी बोलतांना रेवती शेंदुर्णीकर म्हणाल्या की, गेल्या पंचवीस वर्षापासून उद्यमी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मी कार्यरत आहे. त्यामुळे देशभरात अगोदरपासूनच प्रवास सुरू होता. आता या नवीन पदनियुक्तीमुळे देशभरातील महिलांसाठी काम करण्याची मोठी संधी सहकार भारतीच्या माध्यमातून मिळाली आहे. विविध सहकारी बँका, बचत गटाच्या कामकाज करणार्या महिलांना काम करताना येणार्या अडचणी, त्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आयोजित करणे, बचत गटाच्या माध्यमातून या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे असे माझ्या कामाचे स्वरूप असून आता त्याला अधिक गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.