<
प्रतिनिधी – (भुसावळ) – कवितेने समाजाचे हजारो वर्षांपासून प्रबोधन केले आहे.कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे काम करतात.’’अश्रुना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृद्याला कळल्या असत्या, माणुसकीला उंचीवरती सहजच नेता आले असते’’.एकेमकांचे दुःख जर का समजून घेता आले असते तर जगणे किती सुंदर अझाले असते, आणि त्यातून जगण्याच्या जाणिवा समृद्ध झाल्या असत्या असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी नितीन देशमुख यांनी केले. मंगळवार रोजी अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ऑनलाईन प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प गुंफण्यात आले यावेळी ‘प्रश्न टांगले आभाळाला’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे आणि देशदूतचे संपादक हेमंत अलोने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प समन्वयक संजय भटकर यांनी उपक्रमाची रूपरेषा मांडली. तर रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी आई-वडिलांची सेवा हीच आपली संपत्ती असल्याचे मनोगत व्यक्त केले.शहराची श्रीमंती ही सांस्कृतिक जडण घडण, सांस्कृतिक वारसा आणि सांस्कृतिक उपलब्धी यावर ठरत असते.उपक्रम अनेक सुरु होतात पण त्यात सातत्य ठेवणे महत्वाचे आणि कौतुकास्पद आहे अश्या भावना देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी व्यक्त केल्या.समारोपीय मनोगतात तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी कवी हे जगण्याच्या जाणिवा समृद्ध करून समाजाला दिशा देण्याचे काम करतात अश्या सवेंदनशील भावना व्यक्त केल्या.
गझलेतून जीवन जगण्याची जाणीव
‘’जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणार्याला नाही,जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही’’
‘प्रश्न टांगले आभाळाला’ या गझलेतून कवी नितीन देशमुख यांनी जीवन जगण्याची जाणीव करून दिली.जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला उत्तर माती वरती यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आशा मांडल्या.कवितेतून फक्त प्रश्न मांडू नयेत तर उत्तर देखील शोधता आली पाहिजे.’’हल्ली स्वप्ने मातीवरती रांगत नाही, म्हणून आता घरात गरपं नाही, उजेड देणारी ती झाडे विझुन गेली, घरात आता आजी गोष्टी सांगत नाही’’.डिजिटल युगात गती आली आहे.पण आपण स्थिरता, गावखेड्यातील पार, फुरसत,सामंजस्य आणि आपले पानांची जाणीव गमावून बसलो आहे अश्या भावना नितीन देशमुख याने व्यक्त केल्या
उपक्रमासाठी जळगावचे कलारसिक विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे अजय बढे यांचे सहकार्य लाभले तर दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन आणि अमोल हरिभाऊ जावळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प सहसमन्वयक देव सरकटे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील,राजू वारके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. आभार प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी मानले.