<
जळगाव । २९ डिसेंबर २०२१ । शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या मशिदीच्या मागील भागात सांडपाण्याचे मोठे डबके साचलेले होते. परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांनी स्वखर्चाने ३५ ट्रॅक्टर वेस्ट मटेरियल टाकून तो खड्डा बुजविला.
सुप्रीम कॉलनीतील उस्मानिया पार्कमध्ये असलेल्या मशिदीच्या मागील बाजूला सांडपाण्याचा मोठा डबका साचलेला होता. त्याठिकाणी गवत, झाडे झुडपे वाढल्याने डास, मच्छर आणि सरीसृपचा परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. वारंवार याप्रकरणी तक्रार करून देखील कुणीही दखल घेत नसल्याने नागरिक हतबल झाले होते.
नागरिकांचा त्रास लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांनी बुधवारी स्वखर्चाने तो खड्डा बुजविण्यासाठी पुढाकार घेतला. तब्बल ३५ ट्रॅक्टर वेस्ट मटेरियल टाकून त्यांनी तो खड्डा बुजवून संपूर्ण जागेचे जेसीबीद्वारे सपाटीकरण करून दिले. गवत काढताना त्याठिकाणी एक साप देखील आढळून आला. ललित कोळी यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.