<
जिल्ह्यातील सरकारी केंद्र सज्ज : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारी रोखण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार जिल्ह्यात लसीकरण सुरु केले जाणार आहे. त्यानुसार १५ ते १८ वयोगटातील युवकांना निर्देशानुसार फक्त ‘कोवॅक्सीन’ दिली जाणार असून नोंदणीची ऑनलाईन सुविधा १ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर ज्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले असतील तरच त्यांना बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, ६० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती यांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातही याबाबत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, महापालिका रुग्णालयात हे लसीकरण केले जाणार आहे.
१५ ते १८ वर्षांच्या युवकांना कोवीन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी १ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्यांचा जन्म हा २००७ किंवा तत्पूर्वी झालेला हवा. नोंदणीची सुविधा हि लसीकरण केंद्रांवर देखील राहणार आहे. कोविड १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) यांनी दिलेल्या सूचनेनुसार केवळ कोव्हॅक्सिन हीच लस युवकांना दिली जाणार आहे. या युवकांना सरकारी लसीकरण केंद्रात लस मोफत असून खाजगी केंद्रात केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या दरातच लस मिळेल.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तरच त्यांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येणार आहे. दुसरा डॉस घेतल्याच्या तारखेपासून त्यांना ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असले पाहिजे. ६० वर्षे व त्यावरील सह्व्याधी असलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस दिला जाईल. त्यांना त्यांच्या कोवीन ऍपच्या खात्यावरून बुस्टर डोससाठी नोंदणी करता येईल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना फक्त सरकारी लसीकरण केंद्रातच बुस्टर डोस मिळेल. डोस घेण्यासाठी मोबाईलवर संदेश येईल. तसेच डोस घेतल्यावर कोवीन सिस्टीममधूनच प्रमाणपत्र मिळेल.
तरी, युवकांनी आणि आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांनी कुठलीही गर्दी न करता शांततेने लस घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सर्व केंद्रांवर सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले आहे.