<
• सर्व कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवावीत
•लसीकरणावर भर द्यावा
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील मोठ्या शहरात झपाट्याने होणारी कोविड, ओमायक्रॉन रूग्णांची वाढ पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून त्यामुळे सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. कोविड रुग्णांची संसर्ग साखळी खंडित होत असली तरी आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन व कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना तातडी कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज अधिकाऱ्यांना दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.डी. जमादार, राज्य उत्पादन शुल्कच्या सीमा झाबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विजय गायकवाड, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त वि.ब. तासखेडकर, पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जिल्हा रुग्णालयात खाटा उपलब्ध ठेवाव्यात, ऑक्सिजन, इंजेक्शनचा साठा ठेवावा. पुरेशा प्रमाणात लशींच्या मात्रा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करावे. लसीकरण कमी झालेल्या भागात विशेष लक्ष द्यावे. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात. नागरिकांनीही या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा. नागरिकांनी कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लशींचे दोन्ही डोस घ्यावेतय; कोविडच्या नियमांचे पालन करावे. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचे नियोजन करावे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांनी 10 तारखेनंतर लवकरात लवकर प्रिकॉशन डोस घ्यावा. संसर्गाचा प्रादुर्भावा लक्षात घेता सर्व CCC सुसज्ज ठेवावेत. तसेच सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सेंटर यांची पाहणी करून ऑक्सिजनची व्यवस्था, औषधी, उपकरणे यांची तयारी करून ठेवावी. कोविड अनुरूप वर्तनासाठी आवश्यक तिथे दंडात्मक कारवाई करावी, असेही निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महिला रुग्णालय यांचा देखील जिल्हाधिकारी राऊत यांनी आढावा घेतला.