<
जळगाव(प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी पुनश्च एकदा डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने केली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवार दि. ३१ डिसेंबर रोजी काढण्यात आले आहेत. यामुळे जळगाववासियांना नव-वर्षाची पुन्हा एकदा चांगली भेट मिळाली अशी भावना रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने २६ ऑगस्ट रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.मिलिंद फुलपाटील यांची जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक पदाच्या रिक्त जागेवर नेमणूक करून अधिष्ठातापदी अतिरिक्त कार्यभार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र शरीररचना शास्त्र विभागाचे पद रिक्त नाही, असे डॉ. रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दोन वेळा पत्राद्वारे कळविले होते.
त्यानंतरदेखील डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी एकतर्फी पदभार घेतला होता. गेल्या साडे तीन महिन्यांमध्ये निर्णय घेण्यामध्ये कमकुवतपणा असल्यामुळे तसेच गांभीर्याने दुर्लक्ष होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयची दुर्दशा होत होती. हे पाहता राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने डॉ. जयप्रकाश रामानंद यांची पुनर्नियुक्ती केली आहे. आगामी काळात कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी दि.३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडून स्वीकारला.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ.अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.किशोर इंगोले उपस्थित होते. दरम्यान, डॉ. मिलिंद फुलपाटील यांची यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.