<
जळगांव(प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार वंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व सन्मानार्थ विवेकानंद नगर, जिल्हापेठ येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या मार्केटला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट असे नाव देण्यात आलेले आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी काही समाजकंटकांद्वारे सट्ट्याचा अड्डा चालविला जातो.
त्यानिमित्ताने याठिकाणी प्रचंड गोंधळ, भांडण – तंटे होत असतात व मार्केटच्या इतर उपभोक्ते दुकानदार व त्यांच्या गिऱ्हाईकांना तसेच मार्केटमधील शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत असतो. या सर्व प्रकारांमुळे महान राष्ट्रपुरुषाच्या नावाने असलेल्या या मार्केटची ओळख आज सट्टा मार्केट अशी झालेली आहे. हि अत्यंत निंदनीय व खेदजनक बाब आहे. जळगाव शहर महानगरपालिकेने आजवर या प्रकरणी काहीही कारवाई केलेली नाही किंबहुना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.
यामागे महानगरपालिकेचे अधिकारी व समाजकंटकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये व बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गात मोठ्या प्रमाणावर चिड निर्माण होऊन असंतोष पसरला आहे. काही वर्षांपूर्वी संतप्त तरुणांनी हा अड्डा बंद करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मोठा वाद याठिकाणी झाला होता. आज रोजी पुन्हा असा काही जनक्षोभ होऊन जिवीतहानी झाल्यास त्यास या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
तसेच सदर निवेदनाची योग्य दखल घेऊन आपण हा सट्ट्याचा अड्डा बंद करून सदर अड्डा चालविणाऱ्या व्यक्तींवर महानगरपालिकेच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याबद्दल उचित कायदेशीर कार्यवाही करावी आणि तक्रारदार म्हणुन मलाही करण्यात आलेल्या कार्यवाही विषयी कळवावे असे निवेदन छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व महानगरपालिका आयुक्त सतिष कुलकर्णी यांना ईमेलद्वारे दिलेले आहे.