<
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्राजक्ता देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.ए.एन. भंगाळे यांनी सावित्रीबाई फुले यांचे चरित्र, विचार व कार्य यावर प्रकाश टाकला. ते यावेळी बोलताना म्हणाले की, “सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले या दाम्पत्याचे कार्य भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी महिलांना तसेच दलितांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांच्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, विधवा महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे, सतीप्रथेला विरोध असे भारतीय समाजाला दिशा देणारे महत्त्वाचे कार्य केले. सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला समाजसेवेबरोबरच साहित्याचाही पैलू लाभला होता. आधुनिक मराठी साहित्यामध्ये काव्य लिहिणाऱ्या त्या पहिल्या कवयित्री होत.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील होते. त्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून सावित्रीबाईंनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. एस. अहिरराव यांनी केले. जयंती-पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष डॉ. एन. व्ही. चिमणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.