<
जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोविड- 19’ च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकरांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी पात्र कलावंतांनी दहा दिवसांच्या आत संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रात प्रयोगात्मक कलेतील केवळ गुजराण असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकारांना या योजनेचा एकदाच लाभ मिळेल. संबंधित कलावंताचे राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावा आणि वार्षिक उत्पन्न 48 हजारांच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकार, इतर वैयक्तिक शासकीय अर्थसाहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
विहीत नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला (स्थानिक स्वराज्य संस्थेचाही दाखला ग्राह्य), तहसीलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधारकार्ड व बँक खात्याचा तपशील (बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी), शिधापत्रिकेची सत्य प्रत आदी कागदपत्रे अर्जासमवेत जोडावयाची आहेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.