<
जळगाव(प्रतिनिधी)- आमच्या जळगावच्या या ‘सिव्हिल हॉस्पिटल’ ला कधी नव्हे इतके सुवर्ण दिवस आपल्या काळात आलेत. तासनतास रांगेत उभे राहणे, गर्दीचा प्रचंड त्रास, लक्ष देणारे कोणी नाही असे दिव्यांग बांधवांचे होणारे विविध हाल थांबल्याने आम्ही आपला गौरव करीत आहोत, अशा भावनिक शब्दात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन त्यांच्या कार्याचा विविध संस्थांच्या उपस्थितीत शनिवारी दि. ८ जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला.
येथील दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जळगावकरांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा गौरवशाली कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड, नेत्रशल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा आर्या फाउंडेशन अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील उपस्थित होते.
अध्यक्ष गणेश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. मानपत्रात त्यांनी सांगितले की, आपणास “संघर्ष दिव्यांग पुरस्कार” देतांना आम्हाला अतिशय आनंद आहे. आपण आमच्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येऊन त्याचा कायापालट केला. येथील नियोजन व व्यवस्थापन पारदर्शकपणे करून शिस्तशीर कारभार निर्माण केला. तसेच महाविद्यालय व रुग्णालयात सुशोभीकरण आणि स्वच्छता विषयक केलेल्या कामामुळे त्याची दाखल घेत दिल्लीच्या संस्थेने ‘फेस इंडिया ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ पुरस्कार देऊन रुग्णालयाला गौरविले. दिव्यांग बांधवांना त्रास न होता दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे सोईचे व्हावे यासाठी आपण विचारविनिमय करून तसेच सूचना मागवत पारदर्शक कुपन प्रणाली सुरु केली.
यामुळे दिव्यांग बांधवाना थेट ‘अपॉइंटमेंट’ मिळाल्याने दिलासा मिळाला. यासोबत दिव्यांग मंडळामधून अनेक चांगले निर्णय घेतले. रुग्णसेवा करताना रुग्णांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारे आपण कौतुकास पात्र आहेत. सरकारी दरबारी आपणासारखे कर्तव्यदक्ष, शिस्तशीर आणि कठोर अधिकारी मिळणे हे दुर्मिळ झाले आहे. आपल्या कार्यास सलाम करून आम्ही जळगाववासियांतर्फे करीत असलेला आपला गौरव करीत आहोत. यानंतर मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. रामानंद यांनी पुरस्काराला उत्तरं देताना सांगितले की, दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी राज्यभर अडचणी आहेत. मात्र आपण जळगावात एकही अडचण ठेवली नाही. ‘तत्काळ प्रकरण, लवकर वितरण’ यानुसार दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविल्या. रुग्णसेवा सुलभ व्हावी यासाठी शिस्तबद्ध रचनेवर कायम भर राहणार आहे. यावेळी रोहिणी इंगोले, लोकमित्र फाउंडेशनचे शेखर वैद्य, किशोर नेवे, जितू पाटील, अक्षय महाजन, राजेंद्र वाणी, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली कासार, सचिन पाटील, संताराम एकशिंगे, महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी उपस्थित होते.