<
नवी दिल्ली (न्यूज नेटवर्क)- विना जोखमीच्या पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये लोक गुंतवणूक करतात.
या बचत योजना बँकांपेक्षा जास्त व्याजदर देतात. या प्रत्येक योजनेत स्थितीनुसार गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे मॅच्युरिटीवर चांगला परतावा देखील मिळतो.
यामध्ये टॅक्स बेनिफिट्ससोबतच इतरही अनेक फायदे मिळतात, परंतु यापैकी अनेक योजना अशा आहेत, ज्या तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा कोणाच्या तरी माध्यमातून जमा करू शकता. मात्र, आता छोट्या बचत योजनांमध्ये तुम्ही घरबसल्या डिजिटल पेमेंट करू शकणार आहात.
डिजिटल पेमेंट करण्यासाठी, तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) बचत खाते असणे आवश्यक आहे. IPPB एक डिजिटल बचत खाते देते जे तुम्ही घरातून वापरून शकता. आवर्ती ठेव (RD), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी खात्यात (SSY) आयपीपीबी मोबाइल अॅपद्वारे निधी जमा करू शकाल. या योजनांना प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत सूट आहे.
कसे उघडायचे खाते
खाते उघडण्यासाठी, पोस्ट ऑफिसला एकदाच भेट द्यावी लागेल, त्यानंतर तुम्ही सर्व काही ऑनलाइन मॅनेज करू शकता. 31 डिसेंबर 2021 रोजी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रक घोषणेमध्ये असे म्हटले आहे की सरकारने आर्थिक वर्ष 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस योजनांवरील व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
असे जमा करा ऑनलाइन पैसे
– सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून आयपीपीबी खात्यात पैसे जमा करावे लागतील.
– आता तुम्ही DOP प्रॉडक्टवर जा.
– यानंतर पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धीचा पर्याय निवडा.
– जर PPF खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तो पर्याय निवडा.
– आता पीपीएफ खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी टाका.
– सुकन्या समृद्धी खात्यातही योगदान या अॅपद्वारे करता येईल.
– यासाठी SSA खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी द्या.
– यानंतर तुम्ही हप्त्याची रक्कम निवडून पैसे जमा करू शकता.
PPF, SSY वर व्याजदर
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) चौथ्या तिमाहीत 7.1% वार्षिक व्याजदर मिळेल. तर मुलींची सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यात 7.6% व्याजदर दिला जाईल.