<
जळगाव -(प्रतिनिधी)- राज्यावर शुक्रवारपासून अवकाळी पावसाचे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट झाली. शनिवारी सकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. आज सकाळपासूनच थंडीची चाहूल पुन्हा वाढत असून आज रविवारी जिल्हात किमान तापमान १२ तर कमाल तापमान २६ अंशांवर राहणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या स्थितीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. रविवारी वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून, तापमान घसरल्याने थंडीची तीव्रताही वाढणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात शनिवारपर्यंतच अवकाळीची शक्यता असून मराठवाड्यात ९ जानेवारीपर्यंत तर विदर्भात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अगोदरच शेतकरी हैराण असताना, या दणक्याने केळी, हरभरा, गहूसह विविध पिके संकटात आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले.