<
भडगाव(प्रतिनिधी)- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन खो-खो (पुरुष व महिला) स्पर्धा भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व भडगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका प्राजक्ता देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात खेळाडूंचे स्वागत करून स्पर्धकांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना खेळभावनेतून खेळण्याचे आवाहन केले व महाविद्यालय तसेच क्रीडा विभागाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.आर.पाटील होते.
त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी धनदाई महाविद्यालय, अमळनेर येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.शैलेश पाटील (सचिव एरंडोल विभाग क्रीडा समिती), न्हानाभाऊ मंसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.देवदत्त पाटील, डीडीएसपी महाविद्यालय, एरंडोल येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.के.जे.वाघ, प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे पंच म्हणून जळगाव जिल्हा असोसिएशनचे सुशांत जाधव, प्रेमचंद चौधरी, विशाल पाटील, दिलीप चौधरी यांनी कामगिरी पाहिली.
पुरुष संघांमध्ये प्रताप महाविद्यालय,अमळनेरचा संघ विजयी झाला. डी. डी. एस. पी. महाविद्यालय,एरंडोलचा संघ उपविजेता ठरला तर तृतीय क्रमांक सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भडगावच्या संघाने पटकावला. महिला संघांमध्ये सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भडगावचा संघ विजयी झाला. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगावचा संघ उपविजेता ठरला तर तृतीय क्रमांक प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या संघाने प्राप्त केला.
क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी.कांबळे, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. दीपक मराठे, प्रा. संजय झाल्टे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ.सचिन हडोळतीकर, मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख, अरुण वाणी, रवींद्र महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी क्रीडा समिती, माजी खेळाडू संघ व विद्यार्थी-खेळाडू यांचे सहकार्य लाभले.
क्रीडा स्पर्धांसाठी पुरुष व महिला अशा दोन प्रशस्त व आकर्षक मैदानाची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांचा प्रेक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमींनी खेळाचा भरपूर आनंद लुटला. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.