गर्भाशयाच्या मुखामध्ये म्हणजेच ग्रीवेमध्ये होणारे बदल
बहुतेक स्त्रियांच्या ओटीपोटात गर्भाशय असते. त्याला खाली योनीमार्ग जोडलेला असतो आणि दोन्ही बाजूला बीजकोष असतात. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय नसते किंवा उलटे किंवा तिरपे असते. गर्भाशयाचं तोंड योनीमार्गात उघडतं. त्याला ग्रीवा म्हणतात. पाळीचक्रामध्ये ग्रीवेमध्ये बदल होत असतात. या बदलांवरून जननक्षम दिवस ओळखता येतात. (वरील चित्रामध्ये पाळी चक्रात ग्रीवेमध्ये काय बदल होतात याचा आढावा घेतला आहे.)
ग्रीवेतील बदल समजून घेण्यासाठी उकिडवे बसून किंवा एक पाय खुर्चीवर ठेऊन उभे रहावे. योनीमार्गातून बोट आत घालून ग्रीवेला स्पर्श करावा. हात स्वच्छ धुतलेला असावा आणि बोटाची नखं कापलेली असावीत.
- कधी कधी ग्रीवेला सहज स्पर्श करता येतो. ग्रीवा जर घट्ट आणि बंद असते. म्हणजे हा काळ जननक्षम नाही.
- कधी कधी ग्रीवा बोटाला लागत नाही, लागली तरी तिचा स्पर्श मऊसर असतो, ग्रीवा उघडलेली असते आणि ओलसर असते. म्हणजे हा काळ जननक्षम म्हणजेच गर्भधारणेला पोषक असतो.
- ग्रीवेचा स्पर्श मऊ आहे का घट्ट हे समजून घेण्यासाठी – बोटाने आधी नाकाच्या शेंड्याला स्पर्श करा. आणि नंतर खालच्या ओठाला स्पर्श करा.
नाकाचा शेंडा थोडा घट्ट आणि कठीण जाणवतो. कानाचा वरचा भाग आणि कानाची पाळी यांना स्पर्श करा. कानाची पाळी मऊसर लागते.
ग्रीवेच्या स्पर्शातील फरक समजून घेण्यासाठी थोडा सराव आवश्यक आहे. रोज सकाळी उठल्यावर शौचाला गेल्यावर आधी हात स्वच्छ धुऊन ग्रीवेचा स्पर्श कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक महिनाभर असा सराव केल्यानंतर ग्रीवेमध्ये काय बदल होतात हे तुम्हाला लक्षात येईल.
पुढच्या भागात :
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’