<
आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी झालेली आहे. लसीकरण व कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे महत्वाचे आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. केंद्र शासनातर्फे ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले आहेत व त्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत अशांना बूस्टर डोस देण्याच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा सोमवार दि. १० जानेवारी रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी तथा मोहाडी स्त्री रुग्णालयाचे इंचार्ज डॉ.सुशांत सुपे यांना पहिला डोस देऊन उपक्रमाचा शुभारंभ झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार बूस्टर डोस देण्याची जळगाव जिल्ह्याची मोहीम सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरु करण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले. रुग्णालयाच्या ओपीडी क्र. ३०० येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. सुशांत सुपे यांना पहिला बूस्टर डोस देण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी बूस्टर डोसविषयी पालकमंत्री ना. पाटील यांना माहिती दिली.
त्यानंतर लिपिक जितेंद्र परदेशी, पूजा चिरवंडे, ऑपरेटर राकेश पाटील, सार्वजनिक आरोग्य परिचारिका आशा पाटील यांना अनुक्रमे दोन ते पाच क्रमांकाने बूस्टर डोस देऊन सुरुवात करण्यात आली. यानंतर रुग्णालय आवारात जिल्हा परिषद अंतर्गत एनजीओ संस्थेतर्फे दोन लसीकरण वाहन ग्रामीण भागात लसीकरण प्रक्रिया राबविणार आहेत. फीत कापून पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. वाहनात देखील काही आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात आला.
प्रसंगी, कोरोना महामारी थांबिवण्यासाठी गर्दीवर होणारे नियंत्रण थांबविण्यासाठी आवश्यकता भासल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच, दुर्गम भागासह जिल्हाभरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. आज दोन लसीकरण वाहनांचे लोकार्पण केले आहे. आता आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस सुरू झाले आहेत, अशी माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याला आता सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी मदत होणार आहे. तिसऱ्या लाटेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुविधांनी सज्ज झाले आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रभारी कार्यालय अधीक्षक डॉ. संदीप पाटील, अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, अधिसेविका डॉ. प्रणिता गायकवाड उपस्थित होते. अधिपरिचारिका जयश्री वानखेडे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका मनीषा पाटील, आशा पाटील जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी, ज्ञानेश्वर डहाके, अजय जाधव, प्रकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचा सत्कार
धरणगाव तालुक्यातील उखडवाडी येथील मजूर महिलेची ५ दिवसांपूर्वी शेतातच प्रसूती झाली होती. रात्रीच्या वेळी वैद्यकीय कौशल्य पणाला लावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी महिलेसह तिच्या जुळ्या बाळांचा देखील जीव शस्त्रक्रियेद्वारे वाचविला होता. या कार्याची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दखल घेतली. सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पालकमंत्री ना. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान केला. चांगले कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा कायम सन्मान केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री ना. पाटील यांनी दिली.
बूस्टर डोस घेण्याची अशी आहे प्रक्रिया
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तरच त्यांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येणार आहे. दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून त्यांना ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असले पाहिजे. ६० वर्षे व त्यावरील सह्व्याधी असलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस दिला जाईल. त्यांना त्यांच्या कोवीन ऍपच्या खात्यावरून बुस्टर डोससाठी नोंदणी करता येईल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना फक्त सरकारी लसीकरण केंद्रातच बुस्टर डोस मिळेल. डोस घेण्यासाठी मोबाईलवर संदेश येईल. तसेच डोस घेतल्यावर कोवीन सिस्टीममधूनच प्रमाणपत्र मिळेल.