<
जळगाव (क्राईम रिपोर्टर-अनुप पानपाटील) – बलात्काराचा खोटा आरोप बलात्काराइतकाच गंभीर आहे, कारण बलात्कार पीडितेला जेवढी मानहानी आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, तेवढीच मानहानी आणि त्रास बलात्काराचा खोटा आरोप झालेल्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे बलात्काराच्या प्रकरणात लोकांना उगाचच गोवले जाणार नाही, याची काळजी यंत्रणेने घ्यायला हवी, आपण बलात्कार होऊ नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याइतकेच बलात्काराचे खोटे आरोप कुणावर होऊ नयेत यासाठी काळजी घेतली पाहिजे. अश्याच प्रकारच्या आरोपाला जळगाव येथील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांना सामोरे जावे लागले आहे. या बद्दल सविस्तर माहिती सत्यमेव जयते च्या असंख्य वाचकांसाठी पुढीलप्रमाणे सादर करत आहोत.
समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यावर २४ जून रोजी त्यांच्याच कार्यालयात खाजगी नोकरी करणाऱ्या एका महिलेने रामानंद नगर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. एका जबाबदार अधिकाऱ्यावर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. शहरात सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू होती रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर निष्पाप असलेल्या योगेश पाटील यांना अटक करण्याची वेळ आली होती. पोलिस योग्य ती चौकशी करत असतांना संबंधित महिलेने कोर्टात जाऊन “आमच्यात कार्यालयीन वाद झाला होता म्हणून मी रागाच्या भरात २४ जून २०१९ रोजी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या विरोधात रामानंद नगर पोलिसात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योगेश पाटील यांच्यावर असलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात आला आहे,या आशयाचे पत्र संबंधित महिलेने कोर्टात सादर केले होते, असे तपास अधिकारी स. पो. नि. सचिन बेंद्रे यांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चेचे उधाण आले आहे. जनतेच्या समस्या सोडवणाऱ्या एका जबाबदार अधिकाऱ्यावर अश्या प्रकारचा खोटा आरोप झाल्यामुळे लोकांची मने अगदी सुन्न झाली आहेत.