<
जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : – मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी 2022 रोजी बारावा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हा व मतदान केंद्र स्तरावर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करुन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी “ सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी पूर्ण निवडणुका ” हा विषय (Theme) देण्यात आलेला आहे. यावर्षी जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे ऑनलाईन साजरा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून शालेय ( 9 वी ते 12 वी ) तसेच महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी 15 ते 20 जानेवारी, 2022 पर्यंत निबंध, चित्रकला, मीम/पोस्टर, घोषवाक्य, रांगोळी व काव्य स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांचे नियमावली http://nvdj.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदर संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन स्पर्धेत भाग घेता येईल. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने आयोजित विविध ऑनलाईन स्पर्धेमध्ये जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.