<
नांद्रा (ता.पाचोरा)- येथील सामनेर ता.पाचोरा येथील सर्वोदय बहुउउद्देशिय संस्था यांचे वतीने महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “युवा मार्गदर्शन व संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रथम महिला युवा सरपंच सौ.कल्पिताताई पाटील यांनी युवकांशी संवाद साधत, त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिलीत. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रथम महिला युवा सरपंच कल्पिताताई पाटील यांनी युवक युवतींना मार्गदर्शन करतांना कोणतेही काम कठीण नसते वा सोपेही नसते परंतु त्याची सुरुवात कठीण असते तसेच आपण जर त्या कामात स्वतःला झोकून दिले तर ते सहज सुकर होऊन तडीस जाते हे मात्र निश्चित. त्यासाठी सर्वात अगोदर आपण आपल्या मनातील न्यूनगंड दूर करणे महत्वाचे ठरते.मी स्वतः ग्रामीण भागातून असल्याने ग्रामीण युवा व युवतीस काहीही अशक्य नाही हे मी माझ्या अनुभवावरून प्रत्यक्ष अनुभवले आहे. आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असते पण ती आपण सुप्तावस्थेतच न ठेवता तिला प्रवाहित करणे काळाची गरज आहे.यासाठी तीर्थरूपांचे आदर्श संस्कारच आजच्या तरुण पिढीच्या यशाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल अस प्रतिपादन त्यांनी केले. विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर यांनीहि कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे आपल्या मनोगतात सांगितले.
मार्गदर्शनाबरोबरच कल्पिता पाटील यांनी युवक व युवतींच्या प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला. युवक व युवतींनीहि अगदि शिक्षण,10 वी 12 वि नंतर काय ,भविष्यातील पुढील संधी याबरोबरच समाजकारण व राजकारणातीलही बरेच प्रश्न विचारत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच त्यांनी युवतींशी व्यक्तिगत संवाद साधून शिक्षणाबरोबरच समाजकारण , राजकारण यांची सुयोग्य सांगड कशी घालता येईल व सुजाण नागरिक कसे बनावे याबाबत सकारात्मक चर्चा करून युवतींनाही बोलते केले. स्वागतासाठी वटवृक्षाची रोपे दिली व संस्थेच्या पर्यावरण समृद्ध ग्राम संकल्पनेतील हरीत निर्माण उपक्रमा अंतर्गत त्या रोपांची कल्पिता पाटील व उपस्थित मान्यरांच्या शुभहस्ते लागवड करण्यात येऊन पर्यावरण सजगतेच्या संदर्भातील एक चांगला संदेश तरुणानं समोर या कार्यक्रमाचे निमित्ताने ठेवण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन बाळकृष्ण पाटील, विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर,सामाजीक कार्यकर्ते अमित चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन एस.बी.पाटील सर यांनी केले.यावेळी ठाकरे सर,वाघ सर,भोसले सर,चौधरी सर,एस.एम.पाटील व सर्वोदयचे चंद्रकांत साळुंखे ,पंकज साळुंखे,बंटी पाटील , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील तरुण उपस्थित होते.