<
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये तरुण वर्गाचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका. आत्महत्या करण्याचा विचार कोणाला असेल तर त्याच्याशी संवाद साधावा, मार्गदर्शनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मानसोपचार विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप महाजन यांनी सांगितले की, आत्महत्या या घटनेमागे निराशा, अपयश या नकारात्मक भावना आणि मृत्यूचे भय असल्यामुळे आजही आत्महत्या हा विषय मोकळेपणाने चर्चिला जात नाही. परंतु याविषयी योग्य संवाद साधला गेला तर आत्महत्येच्या कल्पनेमागे (सुसाइड आयडिएशन) जी कारणे आहेत त्यांची ओळख सर्वाना होईल. अनेक जण आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतील. चिंताजनक बाब ही की, हताश आणि निराश झाल्यानंतर फक्त प्रौढच आत्महत्येचा मार्ग निवडत नाहीत तर अधिकाधिक मुलं आणि तरुणसुद्धा हा मार्ग निवडतात.
त्यामागची कारणं हिंसा, परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, लैंगिक शोषण, सायबर शोषण, घरगुती समस्या, खऱ्या किंवा आभासी अपयशामुळे आलेली निराशा ही आहेत. आत्महत्या थांबवणे हे एक सार्वत्रिक आव्हान आहे. आत्महत्या ही वैयक्तिक शोकांतिका तर आहेच, कारण हे कृत्य त्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरतं; पण तिच्या स्नेही, कुटुंबीय यांच्यावर न पुसणारा कायमसाठीचा आघात करून जातं, अशीही माहिती डॉ. महाजन यांनी दिली.
आत्महत्यापासून परावृत्त होण्यासाठी किंवा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभाग येथे संपर्क साधावा. डॉक्टरांशी संवाद साधावा, कुठल्याही समस्या कायमस्वरूपी नसतात, नैराश्यातून बाहेर पडावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यमाई केले आहे.
नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये दिसणारे बदल
एकटं-एकटं राहणं, लोकांना सामोरं जाणं टाळणं, आधी आवडणाऱ्या गोष्टींपासून पूर्ण विरक्ती, स्वत:च्या दिसण्याबद्दल पूर्णपणे निष्काळजीपणा असणे, अधिक प्रमाणात मद्यपान किंवा अमली पदार्थाचे सेवन करणे, धोकादायक आणि निष्काळजीपणाने वागणे, नैराश्यातून वाहने अत्यंत वेगाने चालवणे, उगाच धोका पत्करणे, स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल पूर्णपणे बेफिकिरी दाखवणे, आयुष्यातून निरोपाची भाषा वापरणे, स्वत:च्या खासगी वस्तू देऊन टाकणे, मृत्युपत्र बनवणे, मनातले कागदावर उतरवणे, सुसाइड नोट लिहायला घेणे आदी बदल दिसायला लागत असतात.
आत्महत्या थांबवू शकतो का?
एखादी व्यक्ती आत्महत्येबद्दल बोलत असेल किंवा वर सांगितलेल्या गोष्टी करत असेल तर तिचं म्हणणं अत्यंत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीला समुपदेशकाकडे जाण्याबद्दल हळुवारपणे सुचवल्या जाऊ शकतं. त्यांच्या कुटुंबीयांना ‘त्या व्यक्तीला अधिक संवेदनशील वागणूक देण्याची गरज आहे’ असं सूचित केलं जाऊ शकतं. एखादी व्यक्ती भावनाविवश होऊन आत्महत्या करण्याबद्दल उघडपणे बोलत असेल तर अशा व्यक्तीला अजिबात एकटं सोडता कामा नये. त्याचे इतर कुटुंबीय आणि मित्रवर्गाला विश्वासात घेतलं पाहिजे.