<
भौतिक सुखाच्या लालसेपोटी मानवाने पर्यावरणाची अपरिनित हानी केली असून दिवसेंदिवस पर्यावरणातील स्त्रोत संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील प्रत्येक जीव, वृक्ष, वेली आणि वनस्पति यांचे अस्तित्व ठिकवून ठेवणे आणि विकास होण्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा शिवाजी मगर यांनी केले.
ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधनी अंतर्गत आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन टार्गेट पीएचडी एंट्रन्स टेस्ट कार्यशाळेत बोलत होते.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील पीएचडी प्रवेश पात्रता परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नव संशोधकांसाठी महाविद्यालयातर्फे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा शिवाजी मगर यांनी जगातील आणि विशेष करून भारतातील पर्यावरण बचाव आंदोलनाचे दाखले देत सद्यपरिस्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थी, शिक्षक सोबतच समाजातील सर्वच घटकांकडून काय काय उपाययोजना केले जाऊ शकतात यावर सविस्तर मार्गदर्शन केले. व येणारा काळ अख्या जगासाठी भारत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करेल अशी आशा व्यक्त केली.
यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील सुमारे शंभराहून अधिक नव संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन व विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून कार्यशाळेचे आयोजन डॉ एस व्ही जाधव, सहसमन्वयक प्रा दीपक पाटील यांनी केले.
तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर / यावल विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, सर्व सन्मा संस्था पदाधिकारी महोदय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व सन्मा उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचे सर्व सदस्य यांनी मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले.