<
अमळनेर । महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवकांनी वास्तवतेचे जीवन जगत स्वत: विविध कौशल्य आत्मसात करावीत, तरच भारताची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे होईल, असे मत मान्यवरांनी आत्मनिर्भर भारत जागृकता कार्यक्रमात केले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरु युवा केंद्र, जळगाव यांच्या वतीने गडखांब ता. अमळनेर येथे नुकतेच युवकांसाठी आत्मनिर्भर भारत जागृकता कार्यक्रम घेण्यात आला. कै. खुशालदादा उच्च माध्यमिक आश्रमशाळेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. बी. पाटील होते. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथिती व मार्गदर्शक यशदा प्रशिक्षक प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे आदी उपस्थित होते.
युवकांनी अभ्यासासोबत सामाजिक जाणीवही ठेवली पाहिले. समाजाच्या प्रश्नांची जाण यातून येते, भारताच्या उज्वल भविष्यासाठी युवकाचे नेतृत्व महत्वाचे असल्याचे प्राचार्य पाटील यांनी उदाहरणातून सांगितले.
स्वत:मध्ये कौशल्य असेल तरच मनुष्याचा निभाव लागतो. यासाठी युवकांनी आतापासूनच आत्मनिर्भरतेसाठी विविध कौशल्य आत्मसात करावीत, वास्तवतेचे जीवन जगा, कॉपीमुक्त परिक्षेचे धोरण अवलंबवा, असे संदीप घोरपडे यांनी मार्गर्शनात सांगितले,
आत्मनिर्भरतेसाठी युवकांनी सक्षम झाले पाहिजे, यासाठी शारीरिक आरोग्य सदृढ असावे, सध्याचे जग कल्पनावर लढणारे आहे. व्यवसायात आयडीया असेल तरच तो व्यवसाय तग धरतो, आतापासूनच याची पायाभरणी करावी, उद्योगात पैशाची तशी अभ्यासात माहितीची गुतवणूक करावी, असे आवाहन प्रा. पवार यांनी केले.
तत्पूर्वी प्रास्ताविकात नितीन नेरकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होते आहे. यात युवकांचे कार्य कौतुकास्पद आहे. केंद्र सरकारने युवक, शेतकरी, महिला यांच्यासह विविध घटकांचा विचार करून योजना अंमलात आणल्या आहेत. जनधन बँक खाते, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, असंघटीत कामगारांसाठी इ श्रम, आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, उद्योगासाठी कर्ज योजना, महिलासाठी उमेद अभियान आदींची माहिती घेऊन युवकांनी या योजनांची माहिती आपल्या आसपासच्या नागरीकांना करून द्यावी, असे सांगितले. जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर, लेखाधिकारी अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन पी. पी. निकम यांनी तर आभार चेतन जाधव यांनी मानले. या वेळी शशिकांत बोढरे, जे. डी. चौधरी, सायसिंग पाडवी, जे. एम. पाटील, एम. बी. भोई, सी. आर. पाटील, वाय. जी. पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नेहरू युवा मंडळ, गडखांब संस्थेचे सहकार्य लाभले.