<
आर्टिस्ट आनंद पाटील यांची निवड झालेली ‘गो ग्रीन’ जाहिरात मालिका
जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे कला विभागातील सहकारी आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या जाहिरात मालिकेची 61 व्या महाराष्ट्र कला प्रदर्शनाकरिता ऑनलाईन पद्धतीच्या व्यावसायिक गटातील जाहिरात कला प्रकारात त्यांच्या पोस्टरची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे दर वर्षी कला प्रदर्शनाकरिता पेंटींग्ज, शिल्पकला, मुद्राचित्रण, फोटोग्राफी तसेच जाहिरात कला प्रकारांमध्ये विद्यार्थी तसेच व्यावसायिक कलाकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येतात. महाराष्ट्रभरातून यंदा ऑनलाईन पद्धतीने शेकडो प्रवेशिका मागविण्यात आल्या. या प्रदर्शनात जळगावच्या जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या ‘गो ग्रीन’ या जाहिरात मालिकेची निवड झाली आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्यासह कलाविश्वातील रसिकांकडून आनंद पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
‘गो ग्रीन’ पोस्टरबाबत सांगताना आनंद पाटील म्हणाले कि, शून्याचे महत्त्व कायम आहे. शून्य आहे म्हणूनच आपले अस्तित्व टिकून आहे. शून्य जो गणिती भाषेत उपयोगात येतो. परीक्षेत शून्य गुण प्राप्त झाल्यावर आपण पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजेच शून्यामुळे आपण ध्येयाकडे वळतो. तो शून्य आपल्याला आपल्या ध्येयप्राप्तीकरिता प्रेरणा देतो. तोच शून्य इंग्रजीत ‘O’ म्हटला जातो. त्यापुढे ‘2’ लावले असता ते O2 (ऑक्सिजन) होते. सांगायचं तात्पर्य हेच की, हा ऑक्सिजन आपल्याला निसर्गाकडून लाभते, त्यामुळे आपण झाडे लावून पर्यावरणास हातभार लावला पाहिजे. हा शून्य (०) आणि ओ (O) आपल्या जीवनात खूप महत्त्व राखतो. असा महत्त्वपूर्ण संदेश तीन पोस्टर्सच्या माध्यमातून पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाला एकूण 750 प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी 217 जणांची प्रदर्शनाकरीता निवड झालेली आहे. निवड झालेल्या पेंटिग्ज आगामी २४ फेब्रुवारी ते 02 मार्च 2022 या दरम्यान सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, क्रॉफर्ड मार्केट जवळ, फोर्ट- मुंबई येथे प्रदर्शन लावण्यात येणार आहेत. विद्यार्थी तसेच कला क्षेत्रातील रसिक मंडळीकरीता सदरील प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे.