<
तीस संघ होणार सहभागी ; महिलांचेही संघ उतरणार
जळगाव (प्रतिनिधी) : येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल चषक स्पर्धेसाठी “लेवा पाटीदार प्रीमियर लीग”चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे तिसरे वर्ष असून ही स्पर्धा दि. २० ते २७ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संचालक चंदन कोल्हे यांनी शुक्रवारी दि. १८ रोजी पत्रकार परिषदेत दिली.
लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनने कोरोना महामारीविरुद्ध विनामूल्य कोविड उपचार केंद्र पहिल्या लाटेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु केले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेतहि लेवा पाटीदार प्रीमियम लीगने मोहाडी येथील कोविड रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी मराठा प्रीमियर लीगसोबत काम केले. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी “लेवा पाटीदार प्रीमियम लीग” स्पर्धेचे गेल्या तीन वर्षांपासून आयोजन होत आहे. यंदादेखील हि स्पर्धा दि. २० ते २७ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर उत्साहात घेतली जात आहे.
स्पर्धेत ३० पुरुषांचे तर २ महिलांचे संघ सहभागी होणार आहे. महिलांच्या स्पर्धा २५ ते २७ दरम्यान होतील. स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर कृष्णा पेक्टिन्सचे संचालक तथा उद्योजक डॉ. के. सी. पाटील आहेत. रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते नारळ अर्पण करून स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता स्पर्धेचे उदघाटन आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर ललित कोल्हे, उद्योजक सागर भंगाळे, आकाश भंगाळे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. सामने दिवसरात्र पद्धतीने खेळले जाणार आहे. स्पर्धेला मुख्य प्रायोजक जय दुर्गा ग्रुप असून सह प्रायोजक भंगाळे गोल्ड व लक्ष्मी इंजिनिअरींग वर्क्स आहेत. रविवारी २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
पत्रकार परिषदेत सुनील भारंबे, प्रवीण चौधरी, अभिजित महाजन, अमोल धांडे, हितेंद्र धांडे, अक्षय कोल्हे, स्वप्नील नेमाडे, भूषण बढे, लीलाधर खडके, शक्ती महाजन, सिंचन सरोदे,मिलिंद तळेले, अमोल चौधरी, राहुल चौधरी,महेश चौधरी आदी उपस्थित होते.