<
जळगाव-(विशेष प्रतिनिधी)- जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून, रुग्णांना मरणयातना अनुभवास मिळत आहेत. रुग्णवाहिका ज्या तत्परतेने रुग्णांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करते, त्या तत्परतेने आणि काळजीपूर्वक उपचार मिळत नाहीत. त्यामुळे करोडपतीकडे वाटचाल करीत असलेली डॉक्टरांची मुजोरी आणि देखाव्यासाठी उभा करण्यात आलेले सुरक्षारक्षक व तेथील कर्मचारी यांची मुजोरी सर्वसामान्य रुग्णांच्या जीवावर उठली असली तरी अशा प्रकारांना आळा घालण्यात गरजू रुग्णांचे नातलग व शासन आणि प्रशासनाला यश आलेले नाही. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही नामांकित डाँक्टरांची बाहेर स्वतःची खासगी रूग्णालये आहे. त्यामुळेच जळगांव शहरात रुग्णसेवेच्या नावाखाली उभारण्यात आलेली ही देखणी लुटारू रुग्णालये सद्या पेशंन्टच्या नातलगांना लुबाडण्याचे काम करीत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिदिन शेकडो रुग्ण येत असतात. या रुग्णालयातून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना या जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचार दिले जात असल्याने येथील प्रत्येक कक्षात रुग्णांची गर्दी असते. मात्र तेथील तज्ञ डाँक्टर हे स्वतःचे दवाखाने सांभाळत असून डॉक्टर रुग्णालयात फक्त हजेरी लावत असल्याने येथील दर्जेदार उपचार आता कागदावरच राहीले आहेत. या तज्ञ डॉक्टर मंडळीच्या मुख दर्शनासाठी रुग्णांच्या नातलगांना ताटकळत बसावे लागते. हे उघड सत्य आहे की, रुग्णाला गरज नसलेल्या चाचण्या या करुन घेतल्या जातात आणि आपला आजार फार दिर्घ आहे. तुम्हाला खाजगी रुग्णालयात दाखल करावं लागेल, असे भीतीचे वातावरण तयार करून रुग्णांच्या हतबलतेचा फायदा घेतात. रुग्णाचे नातलग यांच्याकडे पर्याय नसल्याने त्यांना त्यावेळी निर्णय घ्यावा लागत असतो. जेणेकरून रुग्ण बरा होऊन जाईल या आशेने डाँक्टरांच्या या कमीशन खोरीच्या साखळीत फसतात. या धंद्यातून संबंधित विभागाचे तज्ञ व डॉक्टर्स यांचाही कमिशनचा उघड धंदा चालतो. कमिशनचे दर टक्केवारी वर आहेत.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सरासरी पेशन्टचे बील पाच लाखाच्या घरात नेल्याशिवाय येथील व्यवस्थापकीय मंडळ आणि डॉक्टर्सना चैनच पडत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आलेल्या पेशंटला डाँक्टरांनी उघडण्यात आलेल्या या खासगी रुग्णालयात सध्या केवळ पेशन्टच्या नातलगांना लुटण्याचे काम सुरू आहे. व्यावसायिक सेवेपेक्षा वैद्यकीय सेवेचे समाधान खुप मोठे असते, याचे भान आता या नामांकित डॉक्टर्स मंडळींना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना राहिलेले नाही.
रुग्णसेवा हि आधीच्या रुग्णसेवेसारखी राहिली नसल्याचे चित्र समोर येत आहे आहे. वैद्यकीय सेवा हि आता एक नॅशनल व्यवसाय झालेला आहे. त्यामुळेच या सर्व प्रकारांना वाव मिळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात पेशन्ट ला काही कारण नसतांना भीतीचे वातावरण निर्माण करून त्याला बाहेरच्या कमिशन देणाऱ्या हॉस्पिटल मध्ये रेफर केले जाते आणि याचा मोबदला म्हणून येथील काही डॉक्टरांना टक्केवारीनुसार कमिशन मिळत असते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उच्च स्तरीय समिती नेमून चौकशीची होण्याची चर्चा नेहमीच सुरु असते पण उपयोग काय ?
कमिशन, दलाली खायची आणि घ्यायची जणू सवयच झालेली आहे पण याचा फटका हा सर्व सामान्य माणसाला सहन करावा लागतोय.
वरील प्रकारांना नेमका आळा कधी बसेल हे मात्र कधीही न सुटणारे कोडे असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात निर्माण झाले आहे.