<
जळगाव, (जिमाका) दि. 24 – महाराष्ट्र शासन, उच्च् व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत जिल्हा ग्रथालय अधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयाच्या नुतन इमारतीचे उदघाटन शनिवारी दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता मा. ना. श्री. उदय सामंत मंत्री उच्च् व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व मा. ना. गुलाबराव पाटील मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयासाठी सन 2018-19 मध्ये 26.50 गुंठे जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून उपलब्ध होवून तात्काळ रु. 5.00 कोटी निधी देखील मंजूर झाल्याने सदर निधीतून या कार्यालयाची सुसज्ज अशी इमारत तयार झाली असून या इमारतीमध्ये सुमारे 250 विदयार्थ्यांसाठी वातानुकूलीत अभ्यासिका, 25 महिलांसाठी स्वतंत्र महिला विभाग, 25 बालकांसाठी स्वतंत्र बाल विभाग, दिव्यांग (अंध) व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग, 15 विदयार्थ्यांसाठी डिजीटल विभाग, मिटींग हॉल व 100 व्यक्तींसाठी ऑडोटोरीयम इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ जळगाव शहरासह जिल्ह्यातील वाचक, अभ्यासक व ग्रंथालय प्रेमींना होणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.