<
कायद्यांची गरज न भासता स्त्रियांनी स्वतःला सक्षम करणे आवश्यक – ॲड. सुवर्णा मराठे
महिलांसंबंधीचे कायदे हे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःला सक्षम करण्यासाठी आहेत. या कायद्यांचा दुरूपयोग होऊ नये. राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले या अगोदर स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आणि त्यांनी महापुरुष घडवले आणि महापुरूषांना सोबत केली. महिलांच्या संरक्षणासाठी संविधानात अनेक कायद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कायद्यांमुळे महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या अत्याचारांपासून तिला संरक्षण मिळते. समाजमाध्यमांच्या माध्यमातून आधुनिक काळात महिलांचे शोषण केले जाते. या शोषणाविरूद्ध आवाज उठवण्याची व्यवस्था प्रचलित कायद्यांमध्ये करण्यात आली आहे. या कायद्यांची गरज आपणास पडूच नये, असे वाटत असेल तर स्वतःला सक्षम करायला हवे. असे आवाहन ॲड. सुवर्णा मराठे यांनी केले.
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविक युवती सभाप्रमुख.डॉ. सी. एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा..जी.एस. अहिरराव यांनी केले तर आभारप्रदर्शन महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. आर.एम. गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे, प्रा.एस. ए.कोळी, डॉ. अतुल देशमुख, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. जनार्दन देवरे, डॉ. गजानन चौधरी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.