<
जळगाव, दि. 15 (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे सध्याच्या युक्रेन आणि रशिया या दोन देशातील युद्ध यासारख्या ज्वलंत विषयावर एक चांगला संदेश देण्याच्या दृष्टीने पत्रलेखन मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत शांती प्रस्थापित व्हावी व युद्ध नको अशा आशयाचे संदेश पत्राद्वारे लिहून आपले विचार गांधी रिसर्च फाऊंडेशनकडे प्रस्तुत करावयाचे आहे. पत्र लेखनासाठी 20 मार्च 2022 पर्यंत अवधि देण्यात आलेला आहे. नागरिकांना नम्रपणे आवाहन आहे की, त्यांनी ‘युद्ध नको’ या पत्रलेखन मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.
या मोहिमेसाठी भारताच्या सर्व नागरिकांना सहभागी होता येईल. परंतु त्यातल्या त्यात संवेदनशील नागरिक / शिक्षक / विद्यार्थी सहभागी झाले तर उत्तमच!सध्या रुस – युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असून त्याला दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये कायम लष्करी डावपेच अर्थात युद्धनीतीच्या आधारावर अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो.
युद्धाचा राष्ट्रांच्या आरोग्यावर आणि आरोग्यावर मोठा घातक परिणाम होतो. अभ्यासातून व अनुभवातून असे दिसून आले आहे की संघर्षाच्या परिस्थितीमुळे कोणत्याही मोठ्या रोगापेक्षा जास्त मृत्यू आणि अपंगत्व येते. युद्धामुळे समुदाय आणि कुटुंबांचा नाश होतो आणि अनेकदा राष्ट्रांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात बाधा येते. मृत्यू, दुखापत, लैंगिक हिंसा, कुपोषण, आजारपण आणि अपंगत्व हे युद्धाचे सर्वात धोकादायक शारीरिक परिणाम आहेत, तर पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), नैराश्य आणि चिंता हे काही भावनिक परिणाम आहेत.
समाजाचा सर्वात लहान घटक प्रत्येक मनुष्याने “युद्ध नको”चा आग्रह धरल्यास, जागतिक समुदायाने शांततेच्या कारणांबद्दलची समज विकसित करून विकास आणि शांततेचे समर्थन करणार्या गोष्टींचा आग्रह धरल्यास युद्धविरहित जग केवळ शक्य नाही तर अपरिहार्य आहे. “वसुधैव कुटुंबकम !” मानणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक पाईकाने हा आग्रह धरला पाहिजे. यासाठीच गांधी रिसर्च फाऊंडेशनने “युद्ध नको” मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमे अंतर्गत आपण जगातील महासत्ता असणाऱ्या देशाच्या प्रमुखांना, नाटो प्रमुखांना पत्र लिहावे असे आवाहन करण्यात येत आहे. सदर पत्र लिहून आपण संस्थेकडे पाठवावे. सर्व पत्र एकत्रित करून गांधी रिसर्च फाऊंडेशन या मोहिमेत सहभागी झालेल्यांच्यावतीने संबंधितांपर्यंत पोहोचवतील. या पत्रलेखन मोहिमेबाबत अधिक माहितीसाठी डॉ. अश्विन झाला (9404955272), गिरीश कुळकर्णी (9823334084), चंद्रशेखर पाटील (9404955220) यांच्याशी संपर्क साधावा.