<
देशमुख महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे ‘स्पोकन इंग्लिश वर्कशॉप’
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे ‘स्पोकन इंग्लिश वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी वक्ते म्हणून दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील इंग्रजी विभागाचे डॉ. हेमंत पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. हेमंत पाटील म्हणाले, की इंग्रजी ही संभाषणासाठी सर्वात सोपी भाषा आहे. दैनंदिन जीवनात व परिस्थितीनुसार बोलल्या जाण्याच्या दृष्टीने इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचा उपयोग केलाच पाहिजे, असे बंधनकारक नसते; तसेच आवश्यक देखील नसते. इंग्रजी भाषेचा वापर करताना तिच्यात सहजता असणे आवश्यक असते. इंग्रजी ही गंमतीदार भाषा असून शिकायला सहजसोपी आहे. कुठल्याही भाषेच्या संदर्भात काळाचा वापर हा आत्मा असला तरी तोडक्या-मोडक्या शब्दांचा उपयोग करून आपण जीवनात इंग्रजीचा प्रयोग संभाषणासाठी करू शकतो. इंग्रजी ही भाषा संभाषणासाठी वापरत असताना आपल्या बोलीभाषेचा तिच्यावर परिणाम होतो.
हा परिणाम आपण लक्षात घेतला पाहिजे. इंग्रजी भाषेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील ज्ञान आपणास मिळते.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ. एन. एन. गायकवाड होते. त्यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. हेमंत पाटील यांनी इंग्रजी भाषेतील विविध उदाहरणांच्या माध्यमातून संभाषण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर इंग्रजी भाषेची गोडी लागावी व वाचन वाढावे यासाठी काय करता येईल, यासंबंधीची माहिती दिली. कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्याचबरोबर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी. कांबळे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन.व्ही. चिमणकर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. एम. मराठे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए.एन. भंगाळे, प्रा.डी.ए. मस्की, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. भालेराव, ग्रंथपाल प्रा. आर.एम. गजभिये, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर, मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख, प्रा. जनार्दन देवरे, डॉ. गजानन चौधरी यांचीही यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. शिवाजी पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन इतिहास विभागप्रमुख डॉ. चित्रा पाटील यांनी केले.