<
जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) :- मूळजी जेठा महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साहित्य, कला आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बहुभाषिक विद्यार्थी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. आज शहीद दिन असल्याने काव्य संमेलनामध्ये विद्यार्थी कवी आणि कवियत्री यांच्याकडून स्वांतत्र्याचा लढा, स्वातंत्र्य सेनानी, भारत देश, स्वातंत्रोत्तर भारताची स्थिती, भारताचे भविष्य, युवा पिढी, भारताची निसर्ग संपदा आणि नारी शक्ती इत्यादी विषयाशी निगडीत मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी भाषेतील कविता सादर करण्यात आल्या. त्यामध्ये ‘शोधला जेव्हा देशा तुझा इतिहास, मला अनेक बलिदानाचे दाखले मिळाले’, ‘ भारत भाग्य जगाना होगा, आलस्य, भेद भाव भगाना होगा’, ‘ मिलता नहीं रास्ता जब मंजिल का, हम अपना हौसला बनाए रखे, चढ़ना जब कठिन लगे शिखर, हाथ अपनों का थामें रखे’, ‘‘या भूमीचा स्वर्ग करण्या आत अपुल्या भान पाहिजे, हातात बदलाचा ध्वज आणि ओठी क्रांती गान पाहिजे’, ‘ ‘महाराष्ट्राच्या दऱ्या खोर्यातून निनादला एकच स्वर, स्वराज्य हे सुराज्य व्हावे’ ‘कौन कहता है, पुरुष रोता नहीं’, ‘ ‘बेटियां तो देश की शक्ति है, प्रकृति का रूप, ईश्वर की भक्ति है’, अशा विविध कविता या संमेलनामध्ये सादर करण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसुर हे होते. डॉ.केसुर यांनी संमेलनाच्या आरंभी उद्घाटनाची औपचारिक घोषणा करून संमेलनास सदिच्छा दिल्या. या संमेलनात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, आय.एम.आर. कॉलेज, मणियार लॉ कॉलेज आणि स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 32 विद्यार्थ्यांनी विविध भाषेतील स्वलिखित कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील संस्कृत विभागातील डॉ.अखिलेश शर्मा यांनी एक संस्कृत भाषेतील स्वलिखित कविता, मराठी विभागातील डॉ.योगेश महाले यांनी स्वलिखित मराठी भाषेतील कविता, प्रा.विजय लोहार यांनी हिंदी भाषेतील स्वलिखित कविता आणि प्रा.किर्ती सोनावणे यांनी इंग्रजी भाषेतील स्वलिखित कविता सादर केल्या.
यावेळी साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ प्रमुख डॉ. भाग्यश्री भलवतकर, डॉ.विद्या पाटील, डॉ.रोशनी पवार, डॉ.विलास धनवे प्रा.देवेश्री सोनवणे, प्रा.गोविंद पवार, प्रा.गोपीचंद धनगर, प्रा.सुनिता तडवी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.चंचल धांडे व कु. मीनाक्षी ठाकूर यांनी केले व आभार प्रा. विजय लोहार यांनी मानलेत.