<
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील होते. याप्रसंगी वक्ते म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख उपस्थित होते. त्यांनी ‘महात्मा जोतीराव फुले यांचे जीवन व कार्य’ या विषयावर विचार मांडले. ते यावेळी बोलताना म्हणाले की, भारतीय समाजाने आपल्या महापुरुषांच्या विचारांचे मोल जाणले नाही. केवळ त्यांना प्रतीकांमध्ये गुंतवून ठेवून त्यांच्या विचारांचे अनुकरण मात्र आपल्याला तितक्या प्रमाणात करता आले नाही, याची खंत वाटते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे आपण पुतळे उभारले त्याचप्रमाणे त्यांचे विचारही आत्मसात करणे आवश्यक आहे. या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
महात्मा जोतीराव फुले हे केवळ बोलके समाजसुधारक नव्हते तर ते कर्ते समाजसुधारक होते. त्यांनी समाजपरिवर्तनासाठी आपली लेखणी आणि वाणी झिजवली. त्याचप्रमाणे स्त्रीशिक्षण, दलितोद्धार, अस्पृश्यता निवारण, सतीप्रथा बंदी, जातीभेद निर्मूलन, विधवा पुनर्विवाह यासाठी फार मोठे कार्यही उभे केले. बहुजन समाजाच्या हजारो वर्षांपासून होत आलेल्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक शोषणाविरुद्ध त्यांनी क्रांती केली. बहुजन गोरगरीब बारा बलुतेदार समाजाच्या गुलामीची कवाडे किलकिली करून त्यांना समतेचा नवा मार्ग प्रशस्त करून दिला.
इतिहास विभागप्रमुख डॉ सी एस पाटील यांनीही आपले मत मांडले. प्रा. एस. आर. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष डॉ. एन.व्ही. चिमणकर यांनी केले तर आभारप्रदर्शन.डॉ. एस.जी. शेलार यांनी केले. अभिवादन सभेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.