<
जळगाव: (अनुप पानपाटील) आषाढी एकादशी दिनी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणे सर्वानाच शक्य नसते; परंतु शाळेतून निघालेल्या पालखी दिंडीतून भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य व्हावे या उद्देशाने, आषाढी एकादशी निमित्त महाबळ येथील त्रंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात त्रंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर येथून निघालेली ही पालखी दिंडी नागेश्वर कॉलनी समतानगर, संभाजीनगर ते पुन्हा त्रंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर येथे विसर्जित झाली. या दिंडीमध्ये आपल्या संस्कृतीचे जतन करणारे आणि पर्यावरणाचा संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी फुगड्या व पावली, टाळ-मृदंग पथक दिंडीचे खास आकर्षण ठरले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र राणे, सचिव सौ.सविताताई भोळे, मुख्याध्यापक संजय भोळे, निलेश मोरे, सौ.चैताली पाटील, सौ.वर्षा भोळे, सौ.रेखा बरसे, सौ.चंद्रकला पवार, चंद्रकांत अत्तरदे, सौ.अमिता महाजन आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.