<
एरंडोल (शैलेश चौधरी ) काही दिवसांपूर्वी घडलेल्या तिवरे धरण फुटल्यामुळे तसेच कोल्हापूर, सांगली व बहुतांश ठिकाणी अतीपर्जन्यवृष्टीमुळे घडलेली आपदग्रस्त परीस्थिती पूर्ण महाराष्ट्रास सर्वश्रृत आहे. याच पार्श्वभूमीवर एरंडोल येथेही अश्या घटनेचा प्रत्यय आला स्थिति अशी की वित्तहानी वगळता जिवितहानी झाली नाही. यामुळे एरंडोल नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजन व गलथान कारभाराची प्रचिती एरंडोल करांना आली आहे.
याबाबत सवीस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी राहूल पाटील या तरूणाने राज्यातील पूरपरीस्थितीचा आढावा घेत व खबरदारीची उपाययोजना करण्याकामी दिनांक ०४/०७/२०१९ रोजी नगरपालिकेस एक निवेदन दिले,या निवेदनात त्यांनी अंजनी नदीचा प्रवाह हा शहराच्या मध्य भागातून जात असल्याने व नदीकाठी वाढलेली जनवस्ती तसेच तेथील नागरीकांचे पुनर्वसनाची मागणी केली होती तसेच अंजनी प्रकल्प व्यवस्थापन विभागास शहराला होणारा संभाव्य धोका व याबाबत घ्यावयाची खबरदारी,उपाय व याबाबत नियोजन व्हावे अशी मागणी करण्यात आली होती.
कालपर्यंत दि. ११/०९/२०१९ पर्यंत झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणाची पातळी कमालीची(अदमासे८०टक्के) वाढल्याने राञी २:३० वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात येऊन हजारो क्युएस पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठावरील कित्येक घरांपर्यंत पाणी पोहचले व काही ठीकाणी पडझड देखील झाली आहे. नगरपालिका कडून बांधण्यात आलेल्या नविन आठवडे बाजार मार्केट लगतची संरक्षक भिंत देखील कोसळली, तसेच कागदीपुरा मशीदीची संरक्षक भिंत देखील कोसळली व नदी काठावरील जळगाव नाका परीसरातील मटण मार्केट जवळील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने एकच घबराट उडाली असल्याने तेथील रहीवाश्यांनी आपला संसारच तूर्तास रस्त्यावर मांडलेला आहे. याप्रश्नी नगरपालिका प्रशासनाकडून त्वरीत दखल घेण्यात येऊन प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. तसेच याबाबत त्वरीत दखल घेण्यात येऊन नागरीकांच्या हीताकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.