<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दि.२६/०२/२०२२ रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांनी विद्यार्थी संवाद आयोजित केला होता त्यावेळी यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने(मासु)३४ प्रश्न उपस्थित केले होते,तेव्हा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांनी चर्चेसाठी वेळ देणार असल्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार दि.०४/०५/२०२२ रोजी शिवालय,मुंबई येथे बैठकीकरिता महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आले.
मासुच्या शिष्टमंडळाने या बैठकी दरम्यान विद्यार्थी हिताच्या विविध मागण्या तसेच अनेक मूलभूत प्रश्न यावर विस्तृत चर्चा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर केली.
खालील महत्त्वाच्या मागण्यांवर मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यावर संबंधितासोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे प्रतिपादन देऊन आम्हाला आश्वासित केले तसेच मासुने उपस्थित केलेल्या सूचनांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.
१) विद्यापीठ आणि महाविद्यालय विद्यार्थी (युनियन) निवडणूका सुरु करण्यात याव्यात.
प्रतिसाद – गृहमंत्री आणि इतर संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
२) विद्यापीठ पदवीधर अधिसभा (सिनेट) सदस्यांची संख्या १० वरुन ३० करण्यात यावी.
प्रतिसाद – सिनेट सदस्यांची संख्या १० वरून १६ करण्यात येतील यावर नियोजन अगोदरपासूनच होते व त्यावर विद्यापीठ कायद्यात अपेक्षित बदल सुचविले आहेत.
३) सर्व अकृषि विद्यापीठात स्वतंत्र विधी विभागाची स्थापना करण्यात यावी.
प्रतिसाद – यावर मंत्री महोदयांनी तात्काळ सर्व विद्यापीठानी विधी विभाग कार्यान्वित करण्यात यावा हे पत्राद्वारे विद्यापीठांना कळवावे अशी सूचना त्यांचा अधिकाऱ्यांना दिली.
४) राज्य विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी.
प्रतिसाद – यावर लवकरच निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात येईल.
५) सर्व अकृषि विद्यापीठात शिका व कमवा योजनेची अंमलबजावणीसाठी ठोस पाऊले तात्काळ उचलळ्यात येतील.
६) नवीन वकिल झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक ५००० हजार रुपये वेतन सुरु करण्यात यावे.(केरळ व कर्नाटकाच्या धर्तीवर)
प्रतिसाद – नवीन वकिलांना मासिक वेतन देण्यासाठी विभाग संबधीताशी चर्चा करून किती वेतन देता येईल यावर निर्णय जाहीर करतील.
वरील महत्वाच्या मागण्याखेरीज
एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेच्या मागणीवर सुद्धा चर्चा करण्यात आली यावर मंत्रीमहोदयांनी सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील परंतु परीक्षा कशा घ्याव्यात त्याचे प्रकार कसे असले पाहिजेत हे सर्वस्वी अधिकार विद्यापीठाकडे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे मागणी करावी.
तसेच बैठकीमध्ये कोंकण विद्यापीठ व स्वतंत्र विधी विद्यापीठ निर्माण करण्यात यावे या मागणीवर सुद्धा चर्चा करण्यात आली.
या बैठकीचे नेतृत्व मासुचे कार्याध्यक्ष ऍड. सुनिल देवरे व राज्य सचिव अरुण चव्हाण यांनी केले असून त्यांच्यासोबत ,जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री.रोहन महाजन, शुभम गिते, जयेश चौधरी,पवन पाटील,भावेश पाटील तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. परेश चौधरी,मासु सहकारी श्री. हर्षल भोईर व धुळे,नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते असल्याची माहिती महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी दिलेली आहे व त्यांनी मंत्री महोदयांचे आभार सुद्धा याद्वारे व्यक्त केले.