<
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी अभिनव उपक्रम
जळगाव वृत्त : आपापल्या कार्यक्षेत्रात सामाजिक संस्था काम करीत असताना अनेक तांत्रिक अडचणी, व्यवस्थापन, पैसा उभारणे ,शासकीय रिपोर्ट वेळेवर तयार करणे, इत्यादी प्रश्न भेडसावतात. अपूर्ण माहितीच्या अभावी अशा संस्था अडचणीत येऊन वेळप्रसंगी बंद पडतात. अशा आजारी संस्थांना योग्य वेळेवर उपचार मिळण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले.
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या 31 व्या वर्धापन दिनी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, मुंबई येथील शून्य ॲडव्हायझर संस्थेचे जयंत फलके व सचिव रत्नाकर पाटील विराजमान होते. प्रास्ताविकात सचिव रत्नाकर पाटील यांनी स्वयंसेवी संस्थांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन निकोप व्हावा हा उद्देश ठेऊन पूरक व्यवस्था, आवश्यक संसाधन या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले तर जयंत फलके यांनी धर्मदाय कार्यालयातील पूर्तता, ठराव, अकाउंट, नविन कायद्यांची माहिती, वार्षिक अहवाल, संस्थेचे प्रेझेन्टेशन इत्यादी बाबी योग्य प्रकारे झाल्यास संस्थांना कोणतीही अडचण येत नाही असे सांगितले.
अध्यक्ष भरत अमळकर यांनी 31 वर्षाच्या कार्यकाळातील समाजाच्या गरजेप्रमाणे सुरू होत गेलेले प्रकल्पांचा प्रवास सांगितला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास येवलेकर यांनी केले. यशस्वितेसाठी सागर येवले, रोहन सोनगडा, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले.