<
गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षा २०२१’ मध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले.
महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाची विद्यार्थिनी कु. दिव्या ज्ञानेश्वर वाडेकर हिने तृतीय वर्ष गटातून प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले तर तृतीय वर्ष कला वर्गाची विद्यार्थिनी कु. करिश्मा राजू तडवी हिने जळगाव जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवित रजतपदक प्राप्त केले. विशेष उल्लेखनीय म्हणजे महाविद्यालयाने या परीक्षेत सतत सहा वर्षे यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल पदकप्राप्त विद्यार्थिनींचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ व व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस.आर.पाटील, कला-वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. एस. डी. भैसे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी.कांबळे उपस्थित होते.
गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक म्हणून डॉ. सचिन हडोळतीकर यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.