<
मुंबई, दि.20 : पतीच्या निधनानंतर महिलांचा सन्मान आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने मिशन वात्सल्य अंतर्गत गठित वार्डस्तरीय व ग्रामस्तरीय पथकांनी समाजात प्रचलित असलेल्या विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जनजागृती व कृतिशील प्रयत्न करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
समाजामध्ये पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कुप्रथा प्रचलित आहेत. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात ठराविक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा महिलांच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी हक्कांचे तसेच त्यांना प्राप्त घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होते. या महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. तसेच त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे.