<
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची उल्हासनगर व नालासोपारा येथील कारवाई
मुंबई, दि. 30 : 133 कोटी रुपयाच्या खोट्या बिलांद्वारे शासनाची फसवणूक करत 19.93 कोटी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या दोघांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन दि. 27/05/2022 रोजी अटक केली. अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मे. देवराम ट्रेडर्स व में. अपोलो एंटरप्राईज या उल्हासनगर व नालासोपारा येथील व्यावसायिक आस्थापनांवर महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाच्या करचोरी विरोधी पथकाने दि. 27/05/2022 रोजी विशेष अन्वेषण कारवाई सुरु केली होती. तपासणी दरम्यान व्यापाऱ्यांनी बनावट वीजबिल, आधार आणि पॅनद्वारे नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले.
राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ, मुंबई व संजय सावंत राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिघे व रविकांत कांबळे यांनी ही कार्यवाही केली. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण सोळा जणांना अटक केली आहे.