<
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : – 29 मे, 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या श्री. दत्तात्रय शालीग्राम पाटील वय – 45 यांच्या हातेड येथील गॅरेज व काझीपुरा ता चोपडा येथील राहत्या घरातुन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, श्री अरुण श्रीराम तायडे जळगाव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व तालुका कृषि अधिकारी दिपक साळुंखे, चोपडा, हे. कॉ. राकेश पाटील, हे. कॉ. किरण धनगर व हे. कॉ. पल्लवी वाणी यांच्या सहकार्यांने सापळा रचुन एकुण रु. 416250/- किमतीचे 333 एचटीबीटी कापुस बियाणे पाकीटे जप्त केली आहे.
याबाबत श्री. दत्तात्रय शालीग्राम पाटील वय – 45 रा. काजीपुरा ता. चोपडा यांचे विरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे क्र.62/2022 दिनांक 29 मे, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगाम 2022 मध्ये अनधिकृत एचटीबीटी, अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. तसेच या बियाण्यांची कोणत्याही परिस्थित शेतकरी बांधवांनी लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा मोबाईल क्र. 08468909641 व दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती दयावी, असे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात येत आहे.