<
जळगाव -(प्रतिनिधी) – रेडक्रॉस व सायकाँलाजीकल कॉन्सिलर्स असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भावस्पर्श सपोर्ट गृप स्थापन करण्यात आला असून या अंतर्गत व्याख्यानमालेचे उद्घाटन रेड क्रॉस भवन येथे करण्यात आले. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तकेंद्र सचिव डॉ. अपर्णा मकासरे, या उपक्रमाचे प्रमुख श्री. धनंजय जकातदार, सौ.पुष्पाताई भंडारी, सौ.शांताताई वाणी, नामांकित वैद्य डॉ. आनंद दशपुत्रे, सायकाँलाजीकल कॉन्सिलर्स असोशिएशनच्या डॉ. प्रतिभा हरणखेडकर, प्रशासकीय अधिकारी श्री.लक्ष्मण तिवारी व मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाची माहिती देताना श्री. धनंजय जकातदार यांनी सांगितले कि मानसिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठीचा हा उपक्रम असून या भावस्पर्श सपोर्ट गृपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एका विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येईल. आपल्या दैनदिन जीवनातील अनेक लहान मोठ्या गोष्टींमुळे आपण विचलित होतो. आणि त्याचा परीणाम नकळत आपल्या आरोग्यावर कधी होतो हे आपल्या लक्षात येत नाही. हा सर्व बाबींचा विचार करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील प्रतिसादानंतर हा उपक्रम कायम स्वरूपी सुरु ठेवण्यात येईल.
रेडक्रॉस उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडक्रॉसच्या माध्यमातून सुरु असलेल्या सर्व सेवा उपक्रमची माहिती दिली. पॅरामेडिकल स्टाफच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि आपुलकीमुळे रुग्णांचा अर्धा आजार दुरुस्त होतो व त्यामुळेच त्यांच्याकरिता आपण परमेश्वररूप असतात अशा शब्दांत उपस्थित पॅरामेडिकल स्टाफचे कौतुक केले. रेडक्रॉस रक्तकेंद्र चेअरमन – डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रेडक्रॉस रक्तकेंद्र अति उच्च रक्त चाचणी प्रणालीचा वापर करून त्याची शुद्धता तपासली जाते. नॅट टेस्टेड रक्त चाचणीमुळे विषाणू संक्रमणाची शक्यता ९९.९९ टक्के दुरावते. आपण सर्व पॅरामेडिकल स्टाफने रेडक्रॉस रक्त केंद्राची पाहणी करावी व रेडक्रॉस रक्तकेंद्रालाच प्राथमिकता द्यावी असे आवाहन केले.
डॉ.आनंद दशपुत्रे यांनी झोप व त्यातील अडथळे या विषयावर व्याक्यान देताना सांगितले कि मानसिक तणाव, चिंता, भीती त्यामुळे झोपेत बाधा येते. २४ तासापैकी आपण जेंव्हा कार्यरत असतो त्यावेळी ज्ञानेन्द्रीय व कर्मेंद्रिय थकतात तो थकवा कमी होण्यसाठी झोप आवश्यक असते. झोप पूर्ण झाली कि माणसाचे ज्ञानेन्द्रीय व कर्मेंद्रिय पुन्हा कार्यरत होतात व आपण उत्साहाने काम करतो. जन्मत: बाळ २४ तास झोपतो, जसजसे वय वाढते झोपेची वेळ कमी कमी होत जाते. वयोवृद्ध माणसे साधारणपणे ६ ते सात तास झोपतात. झोपण्यापूर्वी टी.व्ही. मोबाईल पाहू नये. शांत वातावरण प्रकाश अत्यल्प व मन प्रसन्न करणारे वातावरण असावे. डाव्या कुशीत झोपलेले अतिशय चांगले. रक्ताभिसरण क्रिया व पचन शक्ती चांगली होते. उन्हाळ्यामध्ये दुपारी एक तास तरी झोपावे. वेळ नसेल तर सात ते आठ मिनट डोळे बंद करून स्वस्थ पडावे.
डॉ. अपर्णा मकासरे मार्गदर्शन करताना सांगितली कि निद्रानाश या आजारावर होमिओपॅथीत काय उपचार आहेत परंतु प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्येनुसार उपचार केले जातात. झोप हा सर्व प्राणी मात्रांना परमेश्वराने दिलेला एक वरदान आहे. झोपेमुळे शरीर व मन दोन्हीही स्वस्थ असतात. व्यसनी माणसाला झोप लागत नाही. ज्यांना निद्रानाश आहे ते हळू हळू नैराश्येत जातात व त्यामुळे हृदय विकार, अर्धांग वायू सारखे आजार होण्याची शक्यता बळावते. अशावेळी डॉक्टर कडे जाऊन समस्यांचे निराकरण करा, औषधोपचार करा.
या व्याख्यानासाठी जळगाव शहरातील नागरिक व हॉस्पिटल्स मधील पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आभार प्रदर्शन डॉ. प्रतिभा हरण्खेडकर व सूत्रसंचालन धनंजय जकातदार यांनी केले.