<
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तसेच अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना मिळालेल्या पुरस्कारानिमित्त वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांना “दैनिक सकाळ”तर्फे ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे व डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, अधिसेविका प्रणिता गायकवाड यांच्यासह डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद तसेच प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. हे वृक्ष आम्ही जगवू असा आशावाद यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थी परिषद सदस्य शिवराज मुसळे, तनिष शहा, अविरत पांडव, आशय जाधव, रोहन आळसे, पवन भंडारी, ऋषिकेश वाघमारे आदींनी यावेळी परिश्रम घेतले.