<
जळगाव प्रतिनिधी) : येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील दिव्यांग मंडळाचा जाहीरपणे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दिव्यांग बांधवांसाठी प्रमाणपत्र मिळण्याच्या कार्यवाहीसाठी आदर्श व नियोजनबद्ध कार्यप्रणाली वापरली जात असल्याबद्दल व त्याचा दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये दिव्यांग मंडळाच्य कार्य प्रणालीमध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी काही बदल केले. दिव्यांग बांधवांचे मोठ्या प्रमाणात होणारे हाल पाहता मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. मारोती पोटे यांना कार्यभार दिला. साधारण अकरा महिन्यात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्याच्या कार्यवाहीमध्ये अत्यंत सोपी व सुलभ कार्यप्रणाली सुरु झाल्यामुळे त्यांची गैरसोय थांबली आहे.
स्वतंत्र दिव्यांग मंडळ कक्ष उभारून या ठिकाणी पूर्णवेळ कर्मचारीवर्ग नेमण्यात आले. दिव्यांग बांधवांसाठी कुपन प्रणाली सुरू करून त्यांना तारखेनुसार अपॉइंटमेंट देण्यात येत आहे. दिलेल्या तारखेला संबंधित दिव्यांग बांधवांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होत आहे. त्यानुसार पुढील ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही साधारण महिन्याभरात पूर्ण होत आहे. दिव्यांग बांधवांच्या लहान मोठ्या त्रुटी देखील आता राहिलेल्या नाहीत. यामुळे या आदर्श व नियोजनबद्ध कार्यप्रणालीबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन हृदय सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले की, दिव्यांग बांधवांसाठी प्रमाणपत्र आवश्यक असते. ते मिळण्यासाठी पूर्वी असणाऱ्या अडचणी आता दूर झाल्या असून पारदर्शक व नियोजनबद्ध कार्य प्रणालीमुळे दिव्यांग बांधवांची गैरसोय दूर झाली आहे. कुपन प्रणालीमुळे देखील दिव्यांग तपासणी व्यवस्था सुरळीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ संतोष पोटे, डॉ शंतनु भारद्वाज, दिव्यांग मंडळाचे कर्मचारी विशाल दळवी, चेतन निकम, दत्तात्रय पवार, आरती दुसाने, विशाल पाटील, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांच्यासह प्रहार संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपजिल्हाध्यक्ष योगेश चौधरी, दीपक पाटील, जिल्हा सल्लागार राजमल वाघ, चाळीसगाव तालुका महिला अध्यक्ष स्वाती कुमावत, पूजा जाधव, चाळीसगाव तालुका अध्यक्ष निळकंठ साबणे, किशोर पाटील, पारोळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी ललिताबाई पाटील, गणेश पाटील, जळगाव जिल्हा सचिव राजेश खडके, भिका बेहाळे, महेश गौड, चोपडा तालुका अध्यक्ष भगवान भोईकर, हरिष कुमावत आदी उपस्थित होते.