<
रॕली आणि गीत-संगीताने भरले वातावरणात उत्साहाचे रंग
जळगाव – उन्हाळी सुट्या संपून तब्बल दोन महिन्यांनी 13 जून पासून बहुतांशी शाळा सुरू झाल्या आणि पाळधी येथील इम्पीरीयल इंटरनॅशनल स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि एकुणच उत्साहाचे वातावरण सर्वत्र पाहण्यास मिळाले. तब्बल दोन महिन्यांनी विद्यार्थी पुन्हा परतल्याने अनेक विद्यार्थी अतिशय आनंदात दिसले. विद्यार्थ्यांच्या हुरुपामुळे शाळेला जत्रेचे स्वरूप आलेले दिसले.
सुट्यांनंतर परतलेल्या आणि नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते रेबीन कटींग करुन स्वागत समारोहास शुभारंभ करण्यात आला. या वेळी सर्व विद्यार्थ्यांची रॕली देखील काढण्यात आली. या रॕलीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. या दरम्यान विद्यार्थ्यांद्वारा शाळेच्या कॕंपसमध्ये गीत-संगीत आणि नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे शाळेत एकुणच चैतन्यमय वातावरण पाहण्यास मिळाले. साधारणतः 550 ते 600 विद्यार्थ्यांची शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती राहिली. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांची देखील या वेळी उपस्थिती दिसून आली.
या वेळी विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील सूचना देण्यात आल्या. शाळेची चालु वर्षाची ध्येयधोरणे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आखलेले नियोजन यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. मुख्याध्यापक परवीन मॅडम यांनी आणि संस्था चालक श्री. नरेश चौधरी यांनी विद्यार्थी आणि पालकांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांचे सहयोग लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. वर्षाराणी पाटील यांनी केले.