<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – दि.28– शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत ज्या लाभार्थ्यानी त्यांचे e-KYC प्रमाणीकरण केलेले नाही अशा लाभार्थ्यांकरीता e-KYC
प्रमाणीकरण पुर्ण करण्यास दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थी शेतकरी यांना e-KYC करण्यासाठी पुढीलप्रमाणे OTP किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.
1. ज्या लाभार्थी शेतकरी यांचा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न केलेला असेल अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner मधील e-KYC या टॅब मधुन OTP द्वारे लाभार्थीना स्वतः e-KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल.
2. तसेच e-KYC करतांना काही तांत्रिक अडचण येत असल्यास लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन (CSC) बायोमॅट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15/- मात्र निश्चित करण्यात आला आहे.
तरी जिल्हयातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत आपले e-KYC प्रमाणीकरण पूर्ण करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.