<
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेला राजकीय गोंधळ आता नव्या सरकारच्या स्थापनेने संपुष्टात येताना दिसत आहे. यादरम्यान, सर्वात मोठी बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे समजत होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.
ती म्हणजे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे. शिंदे आज सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून भाजप त्यांना पाठिंबा देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिंदे गट आणि भाजप आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केल्याचेही फडणवीस म्हणाले.
भाजप आणि शिवसेना सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील. तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेटमध्येही नसणार आहेत. ही सुद्धा घोषणा फडणवीसांनीच केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारण फडणवीसांचा रोल काय असणार? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. शिंदे हे शिवसेनेचे नेते. आमच्या मतदारसंघात हारलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचं असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला. की युती तोडायची. ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही, दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यांचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा प्रश्न. त्यावर बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सराकर देऊ लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही. असं मी वारंवार सांगत होतो.