सामनेर ता.पाचोरा(प्रतिनीधी)- येथील सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेकडून जळगाव येथील अर्थ फाउंडेशनच्या सहयोगाने हमीपत्र भरून घेऊन जगविण्याच्या हमीवर बांधावर वृक्ष लागवड करणेसाठी चिंच,मोह,कडुलिंब,बेहळा,बेल या स्वदेशी प्रजातीतील वृक्ष रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
जागतिक तापमानवाढ व पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन यामुळे जैवविविधता प्रचंड धोक्यात येऊ पाहते आहे त्यामुळे वेळीच सजगता निर्माण झाल्यास त्यात कुठेतरी वेगळी दिशा मिळेल या उद्देशाने शासन व सामाजिक स्तरावर वेळोवेळी वैविध्यपूर्ण पावले उचलली जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून सामनेर येथील सर्वोदय या सामाजिक संस्थेने अर्थ फाउंडेशनच्या सहयोगातुन शेतक-यांना बांधावर वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक शेतक-यांकडून वृक्ष जगविण्यासाठीचे हमीपत्र भरून घेतले त्यात शेतक-याचे वृक्ष जगविणे बाबतचे प्रतिज्ञापत्र करून घेत संपर्क क्रमांक घेऊन वेळोवेळी त्याबाबत सातत्याने माहिती घेत व प्रत्यक्ष लागवड केलेल्या ठिकाणी भेट देऊन १००टक्के झाड कसे जगेल या उद्देशाने वृक्षाच्या प्रगतीची माहिती घेतली जाणार आहे.त्यामुळे प्रत्येकजण कटाक्षाने वृक्षाच्या रोपाची काळजी घेत ते जगवेल हा संस्थेचा यामागचा प्रधान हेतू आहे.संस्थेने केवळ वृक्ष लागवडीवर भर न देता ती जगलीच पाहिजे यावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याने हमीपत्र भरून घेण्याचा हा अभिनव प्रयोग संस्थेने केला आहे .त्यास सर्वच शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्ही तुम्हास रोपे जगवूनच दाखवू अशी प्रतिज्ञा केली. संस्थेने आजच्या या कार्यक्रमात १११वृक्ष रोपांचे हमीपत्र भरून घेत मोफत वाटप करत सृष्टीच्या मांगल्य बहरण्यासाठी हातभार लावला आहे.विशेष म्हणजे कोणतीही शासकीय मदत नसतांनाही विविध स्तरावरील समन्वयाचा आधार घेत सर्वोदय परिवार अव्याहतपणे आपले हरीत निर्माण उपक्रमाचे काम बारमाही करत आहे हे वाखाणण्याजोगे आहे. यावेळी देविदास पाटील, योगीराज पाटील,सुभाष वाणी,संभाजी पाटील, राजेंद्र पाटील,सोपान साळुंखे ,बाळू पाटील,रशीद काहाकर,प्रशांत पाटील ,यांचेसह १११जणांना वृक्ष रोपे देण्यात आली यासाठी सर्वोदयचे शिवाजीभाऊ,चंद्रकांत साळुंखे,प्रशांत साळुंखे,चेतन सोनकुळ,पंकज साळुंखे, नरेंद्र पाटील यांनी उत्तम नियोजनपूर्वक रोपांचे वाटप केले.