<
छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेवर कारवाई होऊ नये म्हणून ‘त्या’ डॉक्टरांवर कारवाईचा ‘फास’
तत्कालीन प्रशासकीय अधिकारी डॉ. बन्सी यांच्या ४५ मिनिट ५६ सेकंदाच्या व्हिडीओ चित्रफितीतून केलेले खुलासे धक्कादायक
जळगाव,(प्रतिनिधी)- नाशिक मंडळातील पाच जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना करण्यात आलेल्या आहार सेवा पुरवठा कामात मोठा अपहार झाला असून या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था, नाशिक कारवाई होतांना उपसंचालक कार्यालयाकडून टाळा टाळ होतं आहे. या संस्थेला राज्यातील १०जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामधील उपचारार्थ दाखल रुग्णांना ‘आहार सेवा’ पुरविण्याचे जवळपास १२३ कोटीचे कंत्राट मिळाले असून या आहार सेवेच्या नाशिक मंडळातील कामात मोठा अपहार झाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे नाशिक मंडळाचे संचालक डॉ रघुनाथ भोये व प्रशासकीय अधिकारी श्री. एम. जी.लांजेवार हेच या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’असून यांची उचलबांगळी आरोग्य विभागाने तात्काळ करावी असं आज दिनांक १५ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केली आहे.
जळगावचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह एकूण चार डॉक्टरांना यावल ग्रामीण रुग्णालयातील साहित्य खरेदीमधील अनियमितता व शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी निलंबित करण्यात आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असतांना याचं प्रकरणी निलंबित असलेले तत्कालीन प्रशासकीय अधिकारी डॉ. एस. एस.बन्सी यांनी ४५ मीनीट ५६ सेकंदच्या व्हिडीओ चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करून नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच उघडे पाडल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून मर्जीतल्या ठेकेदार व कंत्राटदार संस्थेवर कारवाई होऊ नये म्हणून या डॉक्टरांवर कारवाईचा ‘फास’ आवळल्या जात आहे.
तत्कालीन प्रशासकीय अधिकारी डॉ. बन्सी यांनी या व्हिडीओ मधून यावल ग्रामीण रुग्णालय येथे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये साहित्य खरेदीमधील अनियमितता व शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी करण्यात आलेली कारवाई नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नसल्याचे डॉ. बन्सी यांनी म्हटले आहे, निलंबित डॉक्टरांना त्यांचं म्हणणं सुद्धा मांडण्याची संधी न देता थेट निलंबन करण्यात आले आहे.
तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व इतरांवर करण्यात आलेली कारवाई आकसापोटी आहे.
अपहार नाहीच…कारवाईचे कारण वेगळेचं…
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयं रोजगार सहकारी संस्था, नाशिक हे रुग्णांना आहार सेवा पुरविण्याचे काम करत आहे, सदर संस्था रुग्णांना शासनाने ठरवून दिलेला आहार पुरवीत नाही, स्तनदा मातांना शेंगदाणा लाडू देत नाहीत, रुग्णांना नास्ता दिल्याजात नाही आणि सदर संस्था यांनी रुग्णसंख्या जास्तीचे दाखवून देयके काढल्या बाबत विजय निकम यांनी तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या अनुसंघाने डॉ. बन्सी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.सदर चौकशी सुरु असतांना कंत्राटदार संस्था आहार सेवा पुरविण्यात अपयशी ठरली असल्याचे दिसून आले, जो आहार रुग्णांना पुरवलाच नाही अशा आहाराचे देयके , जास्तीची रुग्णसंख्या दाखवून देयके काढण्यात आले, आहार सेवेत मोठा घोटाळा झाल्याने या संस्थेवर गुन्हा दाखल करून मोठी कारवाई करावी असे प्रस्तावित असल्याने व असा अहवाल डॉ. बन्सी सादर करणार असल्यानेच नाशिक येथील उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन अहवाल बदलविण्यासाठी चौकशी अधिकारी डॉ. बन्सी यांना आला होता व श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयं. रोजगार संस्था, नाशिक संस्थेवाले ‘आपलीचं माणसं आहेत’ अहवाल सकारात्मक पाठवा, असा दावा या व्हिडीओमधून डॉ. बन्सी यांनी केला आहे मात्र अहवाल बदलणार नसल्याची भूमिका डॉक्टरांनी घेतल्यानेचं सदर कारवाईचा ‘फास’ आवळण्यात आला आहे याप्रकरणी खरे ‘मास्टर माईंड’उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये व उपसंचालक कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. लांजेवार आहेत असा आरोप विजय निकम यांनी यावेळी केला आहे.
त्या अधिकाऱ्यांची राज्य स्तरावरून चौकशी होऊन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे
आहार सेवा पुरविणारी श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयं. रोजगार संस्था, नाशिक या संस्थेवर कारवाई होऊ नये म्हणून उपसंचालक कार्यालयातील उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये व प्रशासकीय अधिकारी लांजेवार यांचा चेहरा आता समाजासमोर उघडा पडला आहे.त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.ते अधिकारी शासनाची सेवा करीत आहेत की कंत्राटदार संस्थेची? असा प्रश्न यावेळी पडला आहे.राज्य स्तरावरून चौकशी होऊन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमची आहे.