<
जळगाव-जिमाका- मागासवर्गीवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे निवास व्यवस्था, चांगले शिक्षणासोबतच त्यांची वैद्यकीय तपासणी सुध्दा नियमित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वसतीगृह निरीक्षण समिती सभेत केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी अे. अे. कुलकर्णी, समाज कल्याण, महिला बालविकास, प्रकल्प कार्यालय, यावल या विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वसतिगृह इमारतींची दुरूस्ती किंवा नुतनीकरण करणे आवश्यक वाटत असल्यास इमारतींचे स्थापत्त तज्ञांकडून अहवाल घेवून दुरूस्ती/नुतनीकरणासारखे कामे सुध्दा करावीत. मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृहाला संबंधित यंत्रणेशिवाय इतरही अधिकाऱ्यांना अधून-मधून भेटी द्याव्यात आणि वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना मिळत असलेले भोजनाचा दर्जा तपासण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत जेवणही करावे. जेणे करून तेथील विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होवून त्याचा त्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आश्रमशाळांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी लवकरच त्यांना नेमून दिलेल्या आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेऊन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचेही बैठकीत सांगितले.